पुणे प्रतिनिधी | भाजपची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार स्वतः लक्ष घालणार असल्याचे बोलले जाते आहे. तर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी वेट अँड वॉच चा पवित्रा धारण केला आहे.
मागील दोन दिवसापासून चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार अशा बातम्या माध्यमात झळकत होत्या. तेव्हा पासून आत्ता पर्यंत शरद पवार यांनी त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर पक्षातून उमेदवार द्यायचा की बंडाच्या तयारीत असलेल्या अपक्ष चंद्रकांत मोकाटे यांनाच पाठिंबा द्यायचा याबद्दल शरद पवार सखोल विचार करत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि शरद पवारांनी आपल्याला पाठिंबा दिला तरच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकायचा अन्यथा बंडाची तलवारच म्यान करायची असा निर्धार चंद्रकांत मोकाटे यांनी केला आहे. तर शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात देखील मोकाटे यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती देखील समोर आली आहे.