हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच शरद पवार त्यांच्या भेटीसाठी वर्षावर गेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा सुरू आहे. सध्या उद्धव ठाकरे परदेशात आहेत, त्याचवेळी शरद पवार थेट वर्षावर गेल्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. पवार असे अचानक एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी का गेले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास ३५ मिनिटे चर्चा झाली. यापूर्वी ठाकरे मुख्यमंत्री असताना पवार सतत वर्षावर जायचे मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच वर्षावर गेले आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्र्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, मात्र हि भेट राजकीय भेट नव्हती तर सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार आले होते असं एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपदही मिळवलं. मात्र शरद पवार यांनी कधीही एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका केली नव्हती, या काळात त्यांनी भाजपवर अनेकदा हल्लाबोल केला होता. तसेच शरद पवार रुग्णालयात दाखल असताना एकनाथ शिंदे स्वतः त्यांना भेटायला गेले होते. जाहीर कार्यक्रमात अनेकदा दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसले मात्र आज प्रथमच शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.