कसब्यात यश मिळेल याची मला खात्री नव्हती, पण…; पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. या विजयांनंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आपल्याला कसब्यातील यशाची खात्री नव्हती असं म्हणत महाविकास आघाडीचा विजय का झाला याचे कारणही सांगितलं.

शरद पवार म्हणाले, कसब्यात यश मिळेल असं सामान्य लोकांच्याकडून ऐकायला मिळत होत. परंतु मला स्वतःला त्याची खात्री नव्हती. याचे कारण म्हणजे नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. कसब्यात अनेक वर्ष गिरीश बापट यांनी प्रतिनिधीत्व केलं होतं. बापट सतत लोकांच्यात मिसळायचे. आणि त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ट संबंध होतेच परंतु याशिवाय जे भाजपचे नाहीत अशा लोकांसोबत सुद्धा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असं वाटत होतं. पण शेवटी शेवटी भाजपने बापट आणि टिळक यांना डावलून निर्णय घेतल्याची कुजबुज ऐकायला मिळाली. त्यामुळे त्याचा फायदा होईल असं वाटत होत.

त्यांनतर निवडणूक झाल्यावर मी माहिती घेतली. त्यातील एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ते कशाचीही अपेक्षा न करता वर्षानुवर्ष सामान्य लोकांच्यात काम करणारे होते. आणि त्यांचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे हा उमेदवार कधी चार चाकीत कधी बसला नाही. दोन चाकीत बसला. त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचं सर्वांचं लक्ष यांच्याकडे होतं. त्यामुळे त्याचा लाभ होईल आम्हाला ऐकायला मिळालं. तसेच पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक मनापासून राबले. त्याचा हा फायदा झाला असं शरद पवार म्हणाले.