जळगाव प्रतिनिधी | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी लढत रंगली आहे. पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीने मुक्ताईनगर मधून माघार घेत पाटील यांना पाठींबा दिला आहे. आपण जाणीवपूर्विकच माघार घेतली असून आता एक एक जागा महत्वाची आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी आज सकाळी जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.
दरम्यान यावेळी त्यांना मुक्ताईनगरात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने माघार का घेतली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, भाजप आणि शिवसेना यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आम्हाला तडजोड करावी लागली. मुक्ताईनगर मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांची माघार हि जाणीवपूर्वक केलेली आहे. या मतदार संघात आमच्या उमेदवारापेक्षा दुसरा कोणी विरोधी उमेदवार प्रभावी ठरेल म्हणून आम्ही तडजोड जाणीवपूर्वक केली आहे, असे ते म्हणाले.
फक्त मुक्ताईनगरच नव्हे तर राज्यातील काही मतदारसंघांमध्ये याच प्रकारे माघार घेण्यात आलेली आहे. ही निवडणूक अतिशय महत्वाची असून अगदी एकेक जागा महत्वाची आहे, असेही शरद पवार म्हणाले. तसेच कलम 370 या मुद्या संदर्भात बोलतांना पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षात सिंचन शेतकरी आत्महत्या कर्जमाफी रस्ते यासारखे प्रश्न प्रलंबित ठेवले. त्यामुळे त्यांना सांगण्यासारखे काही नसल्याने कलम 370 या मुद्द्याचा वापर केला जात आहे.