हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. शरद पवार यांना पुढील चार वर्षासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियमध्ये सुरु आहे. या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. वरपे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. शरद पवार यांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करु असे ट्वीट वरपे यांनी केले आहे.
आज @ccoi_1947 येथील विस्तारित राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत आदरणीय @PawarSpeaks साहेब यांची @NCPspeaks च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करू.
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 10, 2022
दरम्यान, शरद पवार हे देशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवार आगामी लोकसभा 2024 च्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरलेले दिसत आहेत. भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची मागील आठवड्यात नितीशकुमार यांच्यासोबत भेटही झाली होती. मला पंतप्रधान होण्याबाबत कोणताही रस नाही पण भाजप विरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणार अस पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.