हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर या बैठकीविषयी अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आता शरद पवार यांनी ही अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे गुपित उघडले आहे. तसेच, त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरवर देखील भाष्य केले आहे. आज शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
यावेळी भाजपच्या ऑफरविषयी बोलताना, “माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते मला माहिती नाही, पण ती जी गुप्त बैठक होती त्यामध्ये अशा काही गोष्टीची चर्चा झाली नाही. ही गोष्ट मी जाहीरपणे सांगितली आहे” असे शरद पवार यांनी म्हणले आहे. त्याचबरोबर, “भेट झाली नाही, असं नाही. भेट झाली ती उघडपणे. ते मला भेटायला आले होते. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी कुठलाही कुटुंबिक प्रश्न असेल तर…, म्हणजेच माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे, माझा एक सल्ला घ्यायचा. त्यासाठी कुणी आलं असेल तर त्यावर अधिक काही समजयाचं कारण नाही” असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
इतकेच नव्हे तर, “आमचे काही सहकारी गेले. त्यापैकी काही लोक मला भेटले आणि त्यांनी एक नवीन माहिती दिली, या देशामध्ये राजकीय निर्णय राजकीय पक्ष, राजकीय नेते घेतात, असं मला वाटत होतं. पण माझे काही सहकारी त्यांचा निर्णय घेण्याआधी मला भेटले होते. त्यांच्याकडून मला एक नवीन कळलं की, राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते निर्णय घेतात त्याहीपेक्षा एक पवनशक्ती, जिच्यामध्ये ईडी आहे. ती ईडी हे निर्णय घेतात, असं आता दिसायला लागलं आहे. त्यांनी कुणाच्या बाबतीत कधी घेतलं असं मला माहिती नाही” अशी टीका शरद पवार यांनी केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक बैठक पार पडली होती. यानंतर या बैठकीविषयी अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. मुख्य म्हणजे या बैठकीदरम्यान अजित पवार यांनी भाजपाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे यांना दोन मोठ्या ऑफर दिल्याचे विरोधी पक्ष नेत्यांकडून म्हटले जात होते. मात्र आपल्याला अशी कोणतीही ऑफर आलेली नाही असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याचबरोबर आपण भाजपमध्ये जाणार नाही असे स्पष्ट शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर आज पुन्हा शरद पवार यांनी अजित पवारांसोबत झालेली बैठकी एक कौटुंबिक बैठक होती असे सांगितले आहे.