पृथ्वीराज चव्हाणांनी पक्षातील स्वतःचं स्थान चेक करावं; पवारांचे प्रत्युत्तर

sharad pawar prithviraj chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत भाजप आणि राष्ट्रवादीची बोलणी सुरु आहे असा दावा केला होता. राष्ट्रवादी सोबत युती हा भाजपचा प्लॅन बी आहे असा गंभीर आरोप त्यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी स्वतःच्या पक्षातील आपलं स्थान काय आहे ते पाहावं असा टोला पवारांनी लगावला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त शरद पवार आज साताऱ्यात असून यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या विधानांबाबत विचारलं असता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पक्षात आपलं स्थान काय आहे हे एकदा चेक करावं. त्यांच्याच पक्षातील इतर सहकार्यांना जर तुम्ही विचारलं की यांची कॅटेगरी काय आहे तर ते तुम्हाला खाजगीत सांगतील, ओपन मध्ये नाहीत सांगणार असं म्हणत शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आपला वारसदार तयार करण्यात पवार अपयशी ठरले अशी टीका सामनातून करण्यात आली होती त्याबाबत विचारलं असता राष्ट्रवादीत काय होते तो आमचा प्रश्न आहे, आम्ही पक्षात काय करतो, हे राऊतांना माहित नाही असा पलटवार पवारांनी केला. आमचा पक्ष पुढं कसा जाणार याबाबत नवीन फळी कशी उभी केली जाते हे आम्ही पाहातोय, आम्हाला त्यात समाधान आहे. त्यामुळे कुणी टीका केली तरी आम्ही लक्ष देत नाही. आमच्यालेखी सामनाच्या अग्रलेखाचे महत्त्व नाही असं शरद पवारांनी म्हंटल.