हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो असं तेथील लोक म्हणत असल्याचे सांगत पवारांनी फडणवीसांवर बोचरा वार केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झालेत. हे अपघात सातत्याने होत आहेत. हे चित्र गेले काही महिने बघायला मिळत आहे. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. त्यावेळी लोकांनी सांगितले की, आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखादा -दुसरा अपघात झाला आणि जर यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर लोक असं म्हणतात की तो देवेंद्रवासी झाला.
दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या निधीवरूनही शरद पवारांनी भाष्य केलं. हा अपघात प्रचंड दुर्देवी आहे. त्यात अनेक नागरिक दगावले. सरकारने 5 लाख रुपयांचा निधी जाहीर केला, परंतु फक्त पैशाची मदत करून हा प्रश्न सुटणार नाही. यासोबत रस्ता उपाययोजना राबवा, रस्त्याच्या संबंधित असलेल्या तज्ज्ञांचं विशेष पथक तयार करा आणि समृद्धी महामार्गाचा आढावा घ्यावा. त्यानंतरच उपाययोजना करा असा सल्ला शरद पवारांनी राज्य सरकारला दिला.