हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली. त्यांनंतर शिंदे गटाने बंडखोरी करत भाजप सोबत सत्ता स्थापन करूनही राज्यात माविआला अनुकूल वातावरणही दिसत आहे. येत्या 1 मे ला मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभाही पार पडणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगू? असं शरद पवारांनी म्हंटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांना महाविकास आघाडी २०२४ मध्ये एकत्रित निवडणूक लढणार का असा सवाल करण्यात आला असता आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छाच पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यातील काही इश्यू आहेत की नाही त्यावर अजून चर्चा झाली नाही. त्यामुळे 2024 मध्ये आघाडी एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगू? असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या उत्तराने राजकीय चर्चाना चांगलंच उधाण आलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केलं जातंय अशाही चर्चा आहेत, त्यावर सुद्धा पवारांनी भाष्य केलं. कुणी फोडायचं काम करत असेल, त्यांचा तसा काही कार्यक्रम असेल स्ट्रॅटेजी असेल तर ते करत राहतील. आम्हाला जेव्हा यासंदर्भात ठाम भूमिका घ्यायची असेल, तेव्हा ती घ्यावी लागेल. त्यावर आज काही सांगणे योग्य नाही कारण याबाबत आम्ही काही चर्चाच केलेली नाही असं पवार म्हणाले.