हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगाकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यानुसार त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यापूर्वी पवारांनी या घटनेची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी 2018 रोजी घडलेल्या घटनेविषयी आपल्याला काहीही माहिती नाही. दुर्देवी घटनेमागे कोणताही राजकीय अजेंडा किंवा हेतूविषयी माझे कुणावरही आरोप नाहीत, राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर थांबवावा, अशी महत्वाची मागणी पवारांनी केली आहे.
शरद पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगाकडे काही म्हणत्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये ‘कलम 124-अ हे इंग्रजांच्या काळात वाढत्या स्वातंत्र्य चळवळीला दाबण्याच्या उद्देशाने भारतीय दंड विधानात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, अलीकडच्या काळात सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात किंवा लोकशाही व्यवस्थेत शांततेत मांडण्यात आलेला विरोधी विचार दाबण्यासाठीही या कलमाचा गैरवापर झाल्याचे बघायला मिळत आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यात आवश्यक व योग्य त्या तरतुदी आहेत. त्यामुळे 124-अ या कलमाचा गैरवापर कायदादुरुस्ती करून थांबवायला हवा किंवा ते कलम रद्द करायला हवे,’ असे पवार यांनी म्हंटले आहे. तसेच अलीकडच्या काळात सोशल मीडियाचाही प्रचंड गैरवापर होत असल्याचे नमूद करत माहिती-तंत्रज्ञान कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचनाही पवार यांनी केली आहे.