पुणे प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यातील सभेत लक्ष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, माढ्यातून उमेदवारी माघारी घेतल्यामुळे शरद पवारांनी मैदान सोडले. यावर पवारांनी आपल्या शैलीत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ते म्हणाले, जे कधीही मैदानात उतरले नाहीत, त्या ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, असा थेट इशाराच पवारांनी दिला.
शिरुर लोकसभा मतदार संघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, राजकारण करत असताना विधानसभा आणि लोकसभा मिळून मी आतापर्यत 14 वेळा निवडणूका लढवल्या आहेत. त्यापैकी एकही निवडणूकीत मी पराभूत झालो नाही. नवी पिढी आणली पाहिजे, लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे. या उद्देशाने मी माढा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. आणि हे मला म्हणत आहे कि, पवारांनी मैदान सोडले. उद्धव ठाकरेंना आव्हान देताना पवार म्हणाले, उद्धव ठाकरे तुम्ही एकदा तरी मैदानात या. लहानपणी कुस्ती खेळताना आम्हाला जिंकल्यानंतर रेवडी मिळायची.
त्यामुळे आम्हाला मैदानाची सवय आहे. मात्र ज्यांनी मैदान बघितलच नाही. त्यांनी आम्हाला सांगावे कि मैदानात या. मी तर जाऊ द्या, आमच्या तालमीतला एखादा लहान-मोठा पैलवान तुम्हाला चितपट करेल, असे म्हणत पवारांनी उद्धव ठाकरेंना लढण्याचे आव्हान दिले. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.
शिरुरल मतदार संघातील डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचार करताना पवार म्हणाले, डॉक्टर झालेल्या या पोरांने समाजाला उभे करण्यासाठी संभाजी महाराजांच्या भूमिकेतून एक आदर्श उभा केला आहे. मी अमोल कोल्हेच्या पाठीशी ताकदीने उभा असल्याचे पवार म्हणाले.