राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज बैठक; कोणाची ताकद जास्त? आज स्पष्ट होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन्ही गटात कार्यकर्ते आणि नेते विखुरलेले आहेत. दोन्ही गटांकडून आमच्याकडेच जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोणाकडे किती आमदारांचे पाठबळ आहे हे आज स्पष्ट होणार आहे.

आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 1 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांची बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचा मेळावा भुजबळ सीटीला होणार आहे. त्यामुळे कोणाच्या बैठकीला नेमके किती आमदार हजर राहतात यावर दोन्ही गटाची ताकद समजणार आहे.  या बैठकीसाठी दोन्ही गटाकडून व्हीप सुद्धा काढण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची अडचण झाली आहे.

अजित पवार यांच्या बैठकीसाठी अजितदादा गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे कोणाच्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. एकूणच सर्व घडामोडी पाहता राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी आजचा दिवस म्हणजे एकप्रकारची सत्वपरीक्षाच म्हणावी लागेल.