हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच त्यांच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखले जातात. परिस्थिती कशीही असली तरी हार मानायची नाही हाच त्यांचा कानमंत्र…. कॅन्सर सारख्या धोकादायक आजारावर देखील त्यांनी मात केल्याचं आपण पाहिले आहे. आता तर ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबिरात हजेरी लावली आहे. ८१ वर्षाच्या शरद पवारांच्या या उत्साहाचे आणि ऊर्जेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
गेल्या ३-४ दिवसांपासून शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. न्यूमोनिया झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे गेल्या ३ दिवसापासून त्यांनी राजकीय भेटीगाठीही टाळल्या आहेत. मात्र आज राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात उपस्थित राहण्यासाठी पवारांनी हॉस्पिटल मधून तात्पुरता डिस्चार्ज घेतला आणि ते मेळाव्यासाठी शिर्डीला रवाना झाले. विशेष म्हणजे त्यांच्या हाताला हाताला अजूनही बँडेज लावलेलं दिसत आहे. असं असूनही पवारांचा उत्साह आणि त्यांच्यातील इच्छाशक्ती तरुणांना देखील लाजवणारी आहे.
दरम्यान, काल राष्ट्रवादीचं शिर्डीत २ दिवसीय मंथन शिबीर सुरू झालं. आज या शिबीराचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील जवळपास सर्वच दिग्गज नेते या शिबिराला उपस्थित आहेत. शरद पवार यांनी काल या शिबिरात ऑनलाईन सहभाग घेतला होता. आज या शिबिरात थेट हजेरी लावून शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील. शिबीर आटोपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहेत.