हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहमदनगर जिल्ह्यात आज ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार ४६ कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंच्या घरी भेट दिली. कोरोना काळात निलेश लंकें यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली होती.
महत्वाची बाब म्हणजे आमदार, खासदाराचं घर म्हणजे मोठा बंगला, अलिशान गाड्या, नोकरचाकर असं चित्र असतं. पण आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी लंके यांच्या घराची रचना आहे. याच घराच्या लाकडी चौकटीतून पवारांनी लंकेंच्या घरात प्रवेश केला. आपल्या पत्र्याच्या छोट्या घरात पक्षाचे अध्यक्ष आणि देशातील एका बड्या नेत्यानं भेट दिल्यानं लंके कुटुंबीय भारावून गेलं होतं.
एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून पवार यांनी निलेश लंके यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या बाजुला आमदार लंके यांचे आई-वडिल होते, त्यांचीही पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी लंके यांच्या मुलीनेही शरद पवार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी लंकेंच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाबाबत पवारांनी विचारपूस केली. यावेळी, कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हेही हजर होते.