हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून प्रथमच काँग्रेस अध्यक्षपदी बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती बसणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, मनीष तिवारी हि नावे चर्चेत असतानाच आता केरळमधील काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. शशी थरुर हे जी २३ गटाच्या नेत्यांपैकी एक आहेत,
उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शशी थरूर यांनी आपल्या प्रतिनिधीला निवडणूक प्राधिकरणाकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पाठवल आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या विनंती पत्रात नामनिर्देशनपत्रांचे पाच सेट देण्याची मागणी केली आहे. शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. मात्र या निवडणूक प्रक्रियेत आपण तटस्थ असू असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेदेखील काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने अखेर गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं होत. त्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्यासही ते तयार आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 19 ऑक्टोबरला काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल.