हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जिहे-कटापूर योजनेसाठी 289 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी आमदार आणि जलसंपदामंत्री झाल्यावर जिहे-कटापूर योजनेसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्यानेच आज नेर तलावामध्ये पाणी पडू शकले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी या योजनेसाठी काहीच केले नाही, हा आरोप खोटा असून मी मंत्री असतानाच या योजनेसाठी मिशी आला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता केली.
आ. शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रामोशीवाडी, ता. कोरेगाव व परिसरातील गावांना जिहे-कटापूर योजनेतून पिण्याचे पाणी देण्यास विरोध होत आहे. हा विरोध करण्यासाठी पुसेगाव, खटाव येथे मुलेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामागचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना चांगले माहिती आहे. एकाचवेळी आंदोलनकर्त्यांची आणि कोरेगाव तालुक्यातील गावांची दुहेरी फसवणूक हा बोलवता धनी करत असून, कोरेगाव आणि खटावमध्ये वाद पेटवण्यासाठी खटाव तालुक्यातील सामान्य लोकांना आंदोलनाच्या माध्यमातून पुढे करण्याचे घाणेरडे राजकारण केले जात आहे.
नेर तलावाच्या वरच्या परिसरातील काळेवाडी, पांढरवाडी, रणसिंगवाडी, डिस्कळ, गांधीनगर, रामोशीवस्ती, जळकेमळा, अनपटवाडी, चिंचणी, मोळ, तसेच कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी, शेल्टी, खिरखिंडी, भंडारमाची, चिमणगाव, भाटमवाडी, वाघजाईवाडी, जायगाव, एकंबे या गावांचा समावेश लाभक्षेत्रामध्ये करण्यासाठीचा ठराव नियामक मंडळाच्या बैठकीत केला गेला आहे. नेर परिसरातील गावांना ग्रॅव्हिटीने बंदिस्त पाइपलाइनद्वारे तलाव भरून पाणी देण्याची मागणी मी स्वतः तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. ही वस्तुस्थिती असताना ‘पाणी आम्हीच आणले’ असे लोकांची फसवणूक करणाऱ्यांकडून दाखवले जात आहे.
लाभक्षेत्राच्या बाहेरील कोरेगाव, खटाव, माण, सातारा तालुक्यांतील गावांना पाणी देण्याची मागणी मी स्वतः तसेच खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, डॉ. दिलीप येळगावकर, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी आदींनी केली आहे. त्याचबरोबर राजेवाडी (जि. सांगली) येथील तलावाचा समावेश जिहे- कटापूर योजनेचा टेल टॅंक म्हणून करण्याची मागणी खासदार संजय पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केली आहे. या सर्वांच्या मागणीनुसार 63 हजार 432 हेक्टरसाठी 8.20 टीएमसी पाणी लागणार आहे. मग या सर्वांनाच विरोध करणार का? असा प्रश्न आ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.