सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने काल कारवाई केली. त्याचे पडसात आज सातारा जिल्ह्यात उमटले. सातारा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही राऊतांवरील कारवाई व राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीवर निशाणा साधला. दोन-दोन वर्षे चौकशीच्या नावाखाली एखाद्याचा राजकीय जीवन नव्हे तर संसार उध्वस्त होतो. याला कुठतरी कालमर्यादा असणे गरजेचे आहे. ईडीची कारवाई ही विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होत आहे. संजय राऊत याचा आवाज दाबण्यासाठी राजकीय हेतूनेच ईडीची कारवाई केली आहे, असे शिंदे यांनी म्हंटले.
सातारा येथील आंदोलनावेळी आ. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ईडीला कारवाई करण्याचा अधिकार असतो. त्यांचा निकाल काय लागतो हे त्या कोर्टात ठरवले जाते. सुप्रीम कोर्टात 247 केसेस एकत्रित करून ईडीच्या कार्यक्षेत्राबद्दल आणि कारवाईच्या अधिकाराबद्दल मागणी करण्यात आली होती. त्यांच्या कार्यक्षेत्रावर आम्ही आक्षेप घेणार नाही. मात्र, इतक्या दिवस चौकशी केल्यानंतर त्यातून काय साध्य झाले? याचा खुलासा होणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी म्हंटले.
राज्यपाल चले जाव…
महाराष्ट्रातील मराठी बांधवांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज सातारा येथे सातारा राष्ट्रवादी पक्षाचे वतीने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राज्यपाल ‘चले जावा’ अशा घोषणा देण्यात आल्या.