हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 222 कोटी 32 लाख 45 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. शासन निर्णय झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या शासन निर्णयानुसार जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत.
बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरकारने मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत शेतकर्याना मदत दिली जाणार आहे.
शासन निर्णय काय?
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत काढण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयानुसार संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यात येत असली तरी लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करुन त्यानंतरच शासन निश्चित करेल, अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम हस्तांतरीत केली जाईल.