हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील बंडाळीनंतर शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिंदे गटाने राज्यातील आपली पहिली शाखा सुरू केली आहे. शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघातील मानखुर्दमध्ये ही शाखा सुरू करण्यात आली असून आज सकाळी शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता शिंदे गटाने शिवसेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत आम्हीच शिवसेना पक्ष असे सांगितले आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकांशी संवाद साधता यावा म्हणून शिंदे गटाचे मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. या दरम्यान शिंदे गटाकडून मानखुर्दमध्ये पहिली शाखा सुरू करण्यात येत आहेत.
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे. कारण शिंदे गट व भाजपकडून या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये मुंबईतील पाच आमदारांचा आणि एका खासदाराचा समावेश आहे. मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटातील आमदार, खासदारांनी शाखा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.