मुंबई प्रतिनिधी | शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निरर्थक वक्तव्य करू नये. युतीसंदर्भातील बोलणी दोन्ही पक्षांत अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे. २०१४ ला विरोधात बसलो असतो तर आज परिस्थिती वेगळी असती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
आता याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ नाही असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. विधानसभा प्रचाराच्या पुढच्या कार्यक्रमाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत उत्तम लेखक आहेत. त्यामुळे त्यांना बरंच काही चांगलं सुचतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
युतीच्या जागावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू असून बोलणी शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच याची घोषणा होईल. युतीच्या घोषणेवर मी कॉलेजनंतर भविष्य सांगणं सोडलं आहे. देवेंद्र फडणीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांची अमित शहांशी अधूनमधून चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच याची घोषणा करतील. दरम्यान, नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी बोलणं टाळलं. तर राणेंचा प्रवेश हा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला विश्वासात घेऊनच करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.