हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते तथा कॅबिनेटमंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. त्यांच्या या टीकेला खासदार संजय राऊतांनीही पलटवार केला आहे. “नारायण राणेंच्या अटकेची कारवाई हि योग्यच होती. मुख्यमंत्र्याना मारण्याची भाषा कराल तर इतकंच होणार. नारायन राणे तुम्ही सुधर जाओ, संभल जाओ,” अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली.
कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधल्याने त्याचा राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत चांगलाच समाचार घेतला. यावेळी राऊत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी पाठवले असल्याचे सांगितले. मात्र. अशा प्रकारचे आशीर्वाद अनेकांना मिळालेले आहेत.
आशीर्वाद अनेकांना मिळतो. एका पक्षाला किंवा एका व्यक्तीला कोणत्या देशात मिळतो का? जनतेचा आशीर्वाद हा सर्वांना मिळतो. आशीर्वाद मोदीजींना आज मिळालेला आहे. तो मागे इंदिरा गांधीजी, राजीव गांधीजी यांनाही मिळालेला होता आशीर्वाद. जनतेचा आशीर्वाद हा सर्वांना मिळतो. माझे राणेंना एवढंच सांगणं आहे की, सुधर जाओ, संभल जाओ,”
पत्रकार परिषदेत कॅबिनेट मंत्री राणेंनी आता १७ सप्टेंबर नंतर खासदार संजय राऊत यांना उत्तर देणार असल्याचेही सांगितले होते. तसेच संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी संजय राऊत लिहितात, अशी टीकाही मंत्री राणेंनी राऊतांवर केली होती. दरम्यान राणेंच्या टीकेला आता राऊतांनी घणाघाती टीका करून पलटवार केला आहे.