हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबीच्या वतीने क्रूज ड्रग्ज पार्टी वर धाड टाकण्यात आली. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली. त्यानंतर एक खळबळजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप केले जात आहे. मात्र, मलिकांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता,” राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळले पाहिजे. नवाब मलिक यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ती चौकशी झाली पाहिजे. कोणतीही चौकशी करा, पण या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशीच केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात स्यूमोटो कारवाई करायलाच हवी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काही पुरावे समोर आणले आहेत. मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता. खरंतर त्यांच्या पाठीशी संपूर्ण मंत्रिमंडळाने ठामपणे उभे राहायला पाहिजे होते, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.