हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून कोल्हापूर येथे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने मूक आंदोलन सुरु केली आहे. या आंदोलनास अनेक पक्षातील नेत्यांनी पाठींबा दर्शवला असून यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही दाखल झाले आहेत. त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे आजारी असताना देखील सलाईन लावून आंदोलन स्थळी दाखल झाले. तसेच माने यांनी यावेळी आपल्या भाषणात ४८ खासदारांना एकत्रित येण्याचे आवाहनही केले. आणि मराठा आरक्षणासाठी लोकसभेचे अधिवेशन झालंच पाहिजे, अशी मागणीही केली.
कोल्हापुरात आजपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली मुक आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे. या आंदोलनास मोठ्या संख्येने विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षातील नेतेही सहभागी झाले आहेत. यात बुधवारी सकाळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक मराठा आंदोलनस्थळी दाखल झाले. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनास दिग्गज नेते उपस्थित आहेत.
यावेळी आजारी असताना देखील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आंदोलन स्थळी येऊन पाठींबा दर्शवला. यावेळी ते म्हणाले, ” मराठा आरक्षणाचा प्रश्न हाती घेत महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं आहे. या आंदोलनाच्या लढाईत सर्व प्रतिनिधींना एकत्र केल पाहिजे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वांना हाक दिली आहे. त्यामुळे त्यांच्या हाकेला आपण सर्वांनी या ठिकाणी आले पाहिजे. प्रकाश आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले आहेत. आरक्षनाचा प्रश्न कोणामुळे थांबला, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? याकडे आता आपण गांभीर्याने पहिले पाहिजे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असेही शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी म्हणाले.