हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा करताना राज्यातील नेत्यांनी संसदेत आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी सादर केले जाणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “काल पार पडलेल्या अधिवेशनातील चर्चेवेळी भाजपच्या एकाही नेत्यांनी मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणावर बाजू मांडली नाही. त्यामुळे अधिवेशनात त्यांचे बिंग फुटले असून भाजपला मराठा, धनगर समाजावर बोलण्याचा अधिकार आता राहिलेला नाही,” अशी टीका राऊत यांनी केली.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, काल लोकसभेत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणावर बाजू मांडली. यावेळी दानवे यांनीही बोलायला हवे होते. मात्र ते बोलले नाहीत. कालच्या अधिवेशनात भाजपच्या एकाही मंत्र्याने मराठा, ओबीसी आरक्षणासंदर्भात कोणतीही वाच्यता केली नसल्याने आता भाजपचे बिंग फुटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जो कळवळा दाखविण्याचे काम भाजप करत आहे त्या भाजपला आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही.
यावेळी राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. कालच्या अधिवेशनात रावसाहेब दानवे यांच्यासह इतर भाजपनेते तोंड गप्प करून बसले होते. त्यामुळे आता फडणवीसांनी सांगावे कि तुम्ही कोणत्या तोंडाने मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलणार आहात. कोणत्या आधारे या समाजाला आरक्षण देण्याची प्रोव्हिजन या विधेयकामध्ये केली. हे दाखवून देण्याची तयारी त्यांची असायला पाहिजे होती. परंतु ती त्यांनी गमावलेला आहे. त्यामुळे भाजपचा जो खोटा मुखवटा होता मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा तो काळ संसदेत फाडला गेलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने या भाजपपासून सावध राहावे, असे आवाहन करत आहोत.
काल मंजूर केलेले घटना दुरुस्ती विधेयक हे अस्पष्ट आहे. जोपर्यंत केंद्र सरकारकडून ५० टक्केची मर्यादा हटविली जाणार नाही तोपर्यंत या विधेयकालाचा काहीही फायदा मराठा समाजाला होणार नाही. त्यांच्या केंद्र सरकारने विचार करावा, अशी मागणी राऊत यांनी केली.