हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने आता पुढील रणनीती आखली आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळात दाखल होत शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार विधिमंडळातील कार्यालयात ठाण मांडून बसले असल्याने आता उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, शिवसेनेचा ताबा शिंदेंकडे गेल्यानंतर आता आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदारांनी विधिमंडळात प्रवेश केला. आणि त्याठिकाणी असलेले शिवसेनेचं कार्यालय आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेनेचं विधानभवनातील कार्यालय सुद्धा गेले आहे.
शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर आणण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर तातडीने स्टे-ऑर्डर आणण्यासाठी ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील याबाबत सावध भूमिका घेतली असून ठाकरे गटाने याचिका दाखल करण्यापूर्वीच त्यांनी कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहेत.