“भारत बंद” ला शिवसेनेचा पाठिंबा ; जनतेने स्वयंस्फुर्तीनं यात सहभागी व्हावं – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारले आहे. दरम्यान, कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी बळीराजासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जनतेला केले आहे.

‘भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिल्याचे काल आम्ही जाहीर केले आहे. हा बंद फार वेगळ्या प्रकारचा आहे. जो शेतकरी आहे, तो संकट काळात राबत असतो, अस्मानी संकट असो सर्व संकटांशी शेतकरी सामना करत आहे. लॉकडाउनमध्ये सगळे घरी बसलेले असताता त्याने आपल्याला साथ दिली, शेतकऱ्यांनी आज आपल्याला साद दिली आहे.  त्याला आपली गरज आपण त्याला साथ द्यायला हवी. जनतेनं स्वच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं. त्यामुळे हा बळीराजांना खरा पाठिंबा ठरेल’ असं आवाहन राऊत यांनी केले.

राऊत म्हणाले, “जनतेनं स्वयंस्फुर्तीनं बंदमध्ये सामिल झाल्यास खऱ्या अर्थानं त्या बळीराजाला पाठिंबा ठरेल. जरी यामध्ये अनेक राजकीय पक्ष उतरले असले तरी हा राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा संघटनेच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुकारलेला हा बंद नाही तर देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा यासाठी हा बंद आहे” त्यामुळे सर्वांनी या परिस्थितीत शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे’ असंही राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’