मुंबई : राज्यात उद्यापासून कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेत ठाकरे सरकारने संचारबंदीचे मोठे पाऊल उचलले आहे. उद्या १४ एप्रिल रोजी रात्री ८ पासून हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. तसेच यावेळी शिवभोजन थाली १ महिणा मोफत देण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला आहे.
वृद्ध आणि असहाय नागरिकांना येत्या २ महिन्यांसाठी २ हजार रुपये भत्ता आगाऊ देण्याचंही उद्धव ठाकरे यांनी कबूल केलं. राज्यातील ३५ लाख लोकांना याचा लाभ होणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. १२ लाख नोंदणीकृत बांधकाम कर्मचाऱ्यांना, अधिकृत फेरीवाल्यांना, ५ लाख रिक्षाचालकांना १५०० रुपये प्रतिमहिना देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. राज्यात रेमडिसिव्हरची मागणी वाढली असून दिवसा लाखभर औषधांचा डोस येत्या काळात लागण्याची शक्यता असल्याने ही परिस्थिती विचारात घेऊनच या निर्बंधांचा विचार केला असल्याचं ठाकरे म्हणाले.
एकूणच हा लॉकडाऊन लावत असताना 5400 कोटी रुपयांची मदत ही हातावरचं पोट असणाऱ्यांना आणि आरोग्य सुविधा सांभाळणाऱ्या सेवकांसाठी करण्यात आली आहे. रुग्णवाढ रोखण्यासाठी राज्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.