राणेंच्या पाठीमागं शिवसेना हात धुवून, कणकवलीत दिला ‘हा’ उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही भाजपने पक्षात प्रवेश दिला. त्यातच नितेश यांना भाजपने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपच्या या निर्णयाला शिवसेनेने आपला उमेदवार कणकवली निवडणूक रिंगणात उतरवून आपला विरोध दर्शवला आहे.

शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने उघडपणे नितेश यांच्या उमेदवारीला आव्हान देत नुकतेच राणेंची साथ सोडून शिवसेनेत आलेले सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेने सावंत यांना एबी फॉर्म दिला असून त्यांनी लगेचच शिवसेनेकडून नितेश यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे. गेले कित्येक दिवस नितेश राणे यांचा भाजप प्रवेश खोळंबला होता. अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही दिवसात त्यांचा भाजप प्रवेश झाला. आणि त्यांना अपेक्षित कणकवली जागेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळाली. मात्र शिवसेनेने सावंत यांना उभे करून राणे कुटुंबीयांची डोकेदुखी वाढवली आहे. तेव्हा नितेश राणे यांना ही निवडणूक अवघड जाण्याचे स्पष्ट संकेत सध्या तरी मिळत आहेत.