एकनाथ शिंदेंना बाबा ‘योगराज’ची उपमा; सामनातून भाजप- शिंदेंसेनावर जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे. महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा ‘योगराज’ हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत.अशा शब्दांत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

रॅडिसन ब्लू’ या योग शिबिराचे दरवाजे-खिडक्या बंद आहेत. मोकळी हवा येत नाही आणि शिबिरार्थी झापडबंद अवस्थेत पडले आहेत. त्यामुळे कश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. योग शिबिरात सामील झालेल्या किमान सात-आठ जणांवरचे ‘ईडी-पीडी’ बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हे सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे एकदम चरणदास झाले.

भारतीय जनता पक्षाचा उल्लेख महाशक्ती असा केला ते खरेच आहे. काही जणांची ‘ईडी-पीडी’ त्यांनी दूर केली. तसेच काही जणांना ‘ईडी’ची पीडा होईल असे सांगून गुवाहाटीच्या योग शिबिरात जबरदस्तीने भरती केले. त्यामुळे तेथे नक्की कोणत्या प्रकारचे योग सुरू आहेत त्याची कल्पना यावी.

महाराष्ट्र स्थिर आणि शांत राहिला तो मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वामुळेच, पण महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा ‘योगराज’ हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. त्यांनी द्वेषाचे अग्निकुंड पेटवले आहे. त्यात महाशक्तीच्या समिधा पडत आहेत. महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करण्याचे हे कारस्थान आहे. असा आरोप शिवसेनेनं केला.

Leave a Comment