हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. पोलिसांचा दुरुपयोग करुन महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी लावल्याचा आरोपही यावेळी भाजपने केला. भाजपने केलेल्या या सर्व आरोपांवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील!!” असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात-
सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील.
मुंबईतील एका वृत्तवाहिनीचा मालक, संपादक असलेल्या अर्णब गोस्वामी यास एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. श्री. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी अलिबाग निवासी अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येशी संबंधित ही अटक आहे. नाईक यांनी मृत्यूपूर्वी जे पत्र लिहिलं त्यात गोस्वामी यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराचा, फसवणुकीचा संदर्भ आहे. त्याच तणावातून नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली. पण आधीच्या सरकारने गोस्वामी यांना वाचवण्यासाठी हे सर्व प्रकरण दडपले. त्यासाठी पोलीस व न्यायालयावर दबाव आणला. आपल्या पतीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी असा अर्ज नाईक यांच्या पत्नीने पोलीस व न्यायालयासमोर केल्यावर कायद्याने जे व्हायचे तेच झाले आहे.
गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात ‘आणीबाणी’ आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे? अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे. गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे.
त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे. आणीबाणीचा काळ ज्यांनी अनुभवला आहे त्यातले एक लालकृष्ण आडवाणी हयात आहेत व आणीबाणी काय होती हे सध्याच्या नवशिक्यांनी त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे.असं सामना अग्रलेखात म्हंटल आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’