हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आर्थिक संकट, बेरोजगारी, कोरोना आणि निसर्ग अशा संकटाशी सामना सुरू असतानाच त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे. तसेच ईडी, सीबीआयचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा तर विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा आहे असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर टिकेचा बाण सोडला आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षास नक्की काय झाले आहे तेच कळत नाही. महाराष्ट्रातील सरकार ‘पाडू’च असा त्यांचा आत्मविश्वास साफ तुटला आहे. आता सरकार पाडणार नाही, तर आपल्याच ओझ्याने पडेल, असे पसरवायला त्यांनी सुरुवात केली आहे. विरोधकांनी ‘पाडू किंवा पडेल’ असे कितीही ढोल बडवले तरी यापैकी काहीच घडणार नाही,” असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.
शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटले. दोघांत चांगले तासभर ‘गुफ्तगू’ झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे आणि काँग्रेसविषयी काय सांगावे! त्यांच्या प्रमुख नेत्यांची अवस्था आत्मविश्वासाच्या बाबतीत चारही बोटे शुद्ध तुपात अशीच असल्याने तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार श्रीकृष्णाच्या कुरुक्षेत्रावरील रथाप्रमाणे सगळे बाण व हल्ले पचवत विरोधकांशी लढत आहे असे शिवसेनेने म्हंटल.
मागे ‘ईडी’ने भलत्याच प्रकरणी पवार यांना नोटीस बजावली. तेव्हा पवार रस्त्यावर उतरून ‘ईडी’ कार्यालयाकडे जायला निघाले. महाराष्ट्राचे वातावरण तेव्हा ढवळून निघाले होते. ईडी, सीबीआय किंवा आपले महामहीम राज्यपाल महोदय यांचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच आहे,” असं म्हणत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे.