हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणूकीच्या 6 व्या जागेवर भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपच्या या विजयानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून जोरदार टीका करत अपक्ष आणि निवडणूक आयोगावरही बोट ठेवले आहे. फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना?अस म्हणत अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
राज्यसभा निवडणुकीत भाजपाने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीनेच सहावी जागा जिंकावी ही योजना जशी महाविकास आघाडीची होती तशीच भारतीय जनता पक्षाची होती. राजकारणात हे व्हायचेच. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्यांचे गणित भाजपाच्या बाजूने गेले व त्यांचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले. अर्थात जो जिता वोही सिकंदर या न्यायाने सिकंदरांचा जल्लोष व उत्सव सुरू आहे. जणू काही फार मोठा चमत्कारच घडवला आहे, अशा पद्धतीचे अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले नाहीत व फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले. हे एक गौडबंगालच आहे, पण त्याच पद्धतीचा आक्षेप सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदान प्रक्रियेवर घेण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे आमच्या निवडणूक आयोगाचे ‘स्वतंत्र’ व ‘निष्पक्ष’ वर्तन मानायचे काय? असा सवाल शिवसेनेनं केला.
राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया तांत्रिक व किचकट आहे हे खरे असले तरी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांची मते पक्की राहिली. त्यामुळे या सहाव्या जागेच्या निमित्ताने कुणी शहाणे राज्यातील सरकार अस्थिर होण्याची स्वप्ने पाहत असतील तर ते मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे व भक्कम राहील असेही शिवसेनेनं म्हंटल.