निवडणुका आल्या की भाजपवाले दाऊदचा नागोबा बाहेर काढतात अन्…; शिवसेनेचा निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | निवडणुका आल्या की भाजपवाले दाऊदचा नागोबा बाहेर काढतात अन् आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात, असं म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानात संपलेला दाऊद आपल्याकडील तपास यंत्रणा व राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी जिवंत ठेवला आहे असेही शिवसेनेनं म्हंटल.

एनआयएची म्हणे अशी माहिती आहे की, मुंबई-दिल्लीतील अनेक राजकीय नेते व शहरे दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर आहेत. आता दाऊदच्या निशाण्यावर भारतासारखा मोठा देश आणखी किती काळ असणार ते ठरवायला हवे. दाऊद पाकिस्तानात आहे व त्यास फरफटत आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दाऊदला पाकिस्तानचे कवच आहे व ते राहणार, पण भारताचे सरकार ते कवच का तोडू शकले नाही? दाऊद भारतावर हल्ला करीत असल्याच्या ऊठसूट दिल्या जाणाऱ्या बातम्या भारताची बेअब्रू करणाऱ्या आहेत, असं लेखामध्ये म्हटलं आहे

महाराष्ट्राचे पोलीस असे दाऊदी हल्ले उद्ध्वस्त करण्यास समर्थ आहेत, पण पाकिस्तानचे नरडे दाबण्याची ताकद दिल्ली सरकारमध्ये आहे काय? अहमदाबाद येथे जुलै 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील 38 आरोपींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सामुदायिक फाशी ठोठावली, पण त्या बॉम्बस्फोटांतील प्रमुख आरोपींना पकडून त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम सगळय़ात आधी मुंबई पोलिसांनीच केले आहे.

त्यामुळे दाऊद वगैरेंचे काय करायचे ते पाहता येईल. दिल्लीतील सरकार जागेवर आहे काय? हाच खरा प्रश्न आहे. निवडणुका आल्या की, ही मंडळी आपल्या पेटाऱ्यातून दाऊदचा नागोबा बाहेर काढतात व आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात. हे आता नेहमीचेच झाले. पाकिस्तानात संपलेला दाऊद आपल्याकडील तपास यंत्रणा व राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी जिवंत ठेवला आहे. दाऊद वगैरे टोळय़ांत आता काही घडवायचा दम उरलेला नाही असे शिवसेनेनं म्हंटल.