हे तर रडीचे डाव; सोनू सूदवरील धाडीनंतर शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याच्या घरावर आणि विविध कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. सोनू सूदसारख्या लोकांवर छापेमारी म्हणजे रडीचा डाव असून हा पोरखेळ एक दिवस तुमच्यावरच उलटेल असा इशारा शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून दिला आहे

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरु झाला. बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता. तेव्हा ”जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?” असले पाणचट प्रश्न विचारण्यात आले. दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत.असे शिवसेनेने म्हंटल आहे

सोनू कोरोना काळात मजुरांना मदत करीत होता. सोनूने देशातील 16 शहरांत ऑक्सिजन प्लॅण्ट लावले, स्कॉलरशिपची योजना सुरू केली. त्या माध्यमांतून त्याचा बोलबाला झाला. या कार्यक्रमांना भाजपचे लोकही उपस्थित राहत. महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी सोनूस राजभवनावर बोलावून खास चहापान केले. तोपर्यंत सोनू हा या मंडळींना आपला, म्हणजे भाजपचा अंतरात्मा वाटत होता. सोनू महाशय जे महान समाजकार्य करीत आहेत त्यामागे फक्त भाजपचीच प्रेरणा, परंपरा आहे, असे ठासून सांगितले जात होते, पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळविण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असे ठरविण्यात आले.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या भुताटकीने गेल्या काही महिन्यांत अनेकांना पछाडले आहे. महाराष्ट्रातील मंत्री अनिल देशमुख, अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक यांना या तपास यंत्रणांच्या जाळय़ात अडकविण्याचाच डाव आहे. भाजपचे काही चवचाल पुढारी हे स्वतःच्या बाथरुममध्ये घुसावे तसे रोज ‘ईडी’ कार्यालयात जाऊन मोकळे होत आहेत. हा इतका आत्मविश्वास आणि धैर्य वरच्यांच्या पाठबळाशिवाय येणे शक्यच नाही.

भारतीय जनता पक्ष हा जगभरात सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठय़ा राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. विरोधी पक्षांची राज्याराज्यांतील सरकारे असतील किंवा वेगळया विचारांचे लोक असतील, त्या विरोधी विचारांचा आदर राखण्यातच राज्यकर्त्यांचे मोठेपण आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे 12 आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही! असे शिवसेनेने म्हंटल आहे