हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात भाजपमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून मुख्यमंत्र्यांसहित अख्ख मंत्रिमंडळ बदलण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बदलावर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत भाजपला जोरदार टोले लागवले आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपमधील नाचरे मुखवटेही पराभूत होतील असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. मोदी यांना स्वतःचे हे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी 2024 च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. गुजरातमध्ये तर सगळी जमीन उकरून किडकी झाडं मुळापासून उपटून टाकली. हाच प्रयोग त्यांची सरकारं नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. मोदी है तो मुमकीन है म्हणायचं ते इथे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
मोदी यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे व त्या कामी सूत्रे स्वतःकडे ठेवण्याचे ठरवले आहे. देशात एकंदरीत गोंधळाचे चित्र आहे. लोकांत तसेच विरोधकांत मोदींच्या कार्यपद्धतीविषयी जो रोष दिसतोय त्यास स्वतः मोदी किती जबाबदार व त्यांच्या अवतीभवतीचेलोक किती कारणीभूत हे समजून घेण्याची वेळ मोदी-नड्डांवर आली व त्यातूनच गुजरातपासून उत्तराखंडपर्यंत स्वच्छता मोहीम त्यांना हाती घ्यावी लागली असे शिवसेनेने म्हंटल.
गेल्या काही महिन्यांत एक आसाम सोडले, तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालात तर अमित शाह यांनी जिवाची बाजी लावली. केरळात ई-श्रीधरनसारखा मोहरा कामी लावला होता. पण अमित शाह यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्ष जुन्या शिवसेना-भाजपा युतीचा तुकडा पडला आणि भाजपाला विरोधात बसावे लागले. पश्चिम बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डांच्या माध्यमातून मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच”, अशा शब्दांत शिवसेनेने मोदींचं कौतुक करतानाच भाजपावर देखील निशाणा साधला आहे.