कोणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही – शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशात नवी बॉलिवूडनगरी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी यांनी केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बॉलिवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यातच मनसेनेही कधी नव्हे ते मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळून जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय अस वक्तव्य केले होते.आणि एकप्रकारे शिवसेनेला पाठिंबाच दिला होता. यासंदर्भातच आज सामना अग्रलेखातुन सविस्तर भाष्य करत शिवसेनेनं भाजपला इशारा दिला आहे.बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. अस सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

बॉलीवूडला हलवणे म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील प्रमुख लोकांशी चर्चा केली. त्यांना दिलासा दिला हे योग्यच झाले. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया मुंबई-महाराष्ट्रात घातला. हा पाया कच्च्या पायावर उभा नाही. लवकरच ‘पडदे’ जिवंत होतील, बॉलिवूडला जाग येईल. मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला हवा,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

बॉलिवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचायला हवा तेथे तो नक्कीच पोहोचला आहे. हिंदी सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूडची पाळेमुळे मुंबईत पसरलेली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून ही पाळेमुळे मजबुतीने टिकून आहेत. अनेकांचे कष्ट आणि घाम त्या कारणी लागले आहेत. पण सुशांत मृत्यू प्रकरणानंतर काही पोटदुख्यांनी बॉलिवूडविरोधात जी मोहीम सुरू केली आहे ती धक्कादायक आहे,” असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

बॉलिवूडला संपवण्याचे किंवा हे क्षेत्र अन्यत्र हलवण्याचे कटकारस्थान कोणी रचत असेल तर ते उधळून लावू. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत परखडपणे यावर भाष्य केले हे बरे झाले. लॉकडाऊन काळात बॉलिवूडचे काम थंडावले. चित्रीकरणावर बंधने आली. टीव्हीवरील मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. पण सिनेजगतावर आजही मंदीच्या सावल्या आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक मोठी आहे; पण कोरोना संसर्गामुळे सात महिन्यांपासून सिनेमागृहे बंद आहेत. सिनेमागृहांचे स्वतःचे एक अर्थकारण आहे. ‘बॉलिवूड’ म्हणजे फक्त नट-नटय़ांची चमकधमक नाही, तर हे असे जोड उद्योगदेखील आहेत,” असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

सुशांत राजपूत या कलावंताची आत्महत्या दुर्दैवी आणि धक्कादायक आहे; पण त्याच्या प्रेतावरचे लोणी खाऊन छोटय़ा पडद्यावर जो नंगानाच केला जात आहे तो असह्य आहे. बॉलिवूडचे पाच-दहा प्रमुख लोक येथे बसून पाकिस्तानचा अजेंडा चालवत आहेत असे स्वतःच्या मालकीच्या चॅनेलवरून भुंकले गेले. त्यामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment