हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हनुमान चालिसा वर राज्यात कोणी बंदी घातलेली नाही. तरीही ‘मातोश्री’वर जाऊन ‘हनुमान चालिसा’ वाचण्याचा अट्टहास कशासाठी? यामागे भारतीय जनता पक्षाचेच कुजके डोके आहे अस म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून राणा दाम्पत्य आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच हनुमान चालिसा’चा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर करायचाच होता तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान मोदींचे निवासस्थान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे दालन अशा ठिकाणी या दाम्पत्याने पठण करायला हवे असा टोलाही शिवसेनेनं लगावला.
भारतीय जनता पक्षाने सध्या हिंदुत्वाच्या नावाने जो धांगडधिंगा सुरू केला आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. हिंदुत्व हा एक संस्कार आणि संस्कृती आहे, धिंगाणा नाही. अमरावतीचे राणा दाम्पत्य हे अनुक्रमे खासदार व आमदार आहेत. ते कधी कोणत्या पक्षात असतील व कोणता झेंडा खांद्यावर घेतील त्याचा भरवसा नाही. श्रीरामाचे नाव घेण्यास राणाबाईचा विरोध होता. संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज ‘हनुमान चालिसा’ वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात व समस्त भाजपे नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचते है आश्चर्यच आहे. भाजपचे ढोंग यातुन उघडे नाही तर नागड झालं आहे असे शिवसेनेनं म्हंटल.
हिंदुत्व, श्रीरामाला जाहीरपणे विरोध करणारे हे दाम्पत्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘धर्मनिरपेक्ष’ पाठिंब्याने निवडून आले व आता भाजपच्या कळपात शिरले. अशा शेळया-मेंढयांच्या मदतीने भाजपला शिवसेनेवर हल्ले करायचे आहेत. राणा दाम्पत्यास अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. जणू काही राणी चेन्नम्मा, झाशीच्या राणीवरच कारवाई झाली अशा आविर्भावात हे सगळे लोक पोलीस ठाण्यात धावले व पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसून छाती पिटू लागले.
आयएनएस विक्रांत घोटाळय़ातील आरोपी किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यास भेटायला गेले तेव्हा संतप्त लोकांनी त्यांच्यावर चपला व दगड फेकले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असे भाजपवाले म्हणत असतील तर ते एकप्रकारे चोर, लफंग्यांचे समर्थन करीत आहेत. खरा विनोद पुढेच आहे. आयएनएस विक्रांतप्रकरणी पैशांचा अपहार करणाऱ्या आरोपीला केंद्राने विशेष सुरक्षा कवच दिले आहे. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणांसाठीदेखील केंद्राने अलगद सुरक्षा कवच दिले आहे. ‘ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला व केंद्राची सुरक्षा मिळवा’, अशी ‘ऑफर’ बाजारात आलेली दिसते. अशाने कायद्याचे राज्य कोसळून पडेल! असा इशारा शिवसेनेनं दिला.