हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे याना एनआयए कडून अटक करण्यात आली असून राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. वाझे यांच्या अटकेनंतर विरोधी पक्ष भाजप अजून आक्रमक झाला असून भाजपकडून शिवसेनेला खिंडीत गाठलं जात आहे. दरम्यान शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखात याप्रकरणी भाष्य करताना भाजपवरच पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता आणि शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे, हे आश्चर्यच आहे. सचिन वाझे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, ही अपेक्षा, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
वाझे यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर, या चर्चेला आता अर्थ नाही. विरोधकांची सरकारे अस्थिर किंवा बदनाम करण्यासाठी कोणत्याही थराला जायचे, बनावट प्रकरणे निर्माण करायची, राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करायचे हे प्रकार सध्या सर्रास चालले आहेत. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? हात चोळत बसले. असेही सामना अग्रलेखात म्हंटल आहे.
बिहार-नेपाळ सीमेवर हत्यारांची, स्फोटकांची आवक-जावक सुरूच असते. मणिपूर-म्यानमार सीमेवरील स्थिती अशा बाबतीत गंभीरच असते. नक्षलग्रस्त भागात तर बंदुका, स्फोटकांचे कारखानेच निर्माण झाले असून तेथे देशविरोधी कट-कारस्थाने सुरू आहेत, पण तुमचे जे जिलेटिन छाप एनआयए की काय आहे, ते त्या स्फोटकांचा वास घ्यायला गेले नाही. केंद्राला तशी गरजच वाटत नसावी, असा घणाघातही शिवसेनेनं केला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group