शिवसेनेचा ‘हा’ दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीच्या निकालानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. या निवडणुकीत उमेदवाराचा प्रभाव झाल्याने आता त्याचे परिणाम इतर ठिकाणी होणाऱ्या पोट निवडणुकीत जाणवू लागले आहेत. नांदेडमधील देगलूरच्या आगामी पोट निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या अगोदरपासुनच पक्षांतर करण्याचा इशारा इच्छुक उमेदवारांकडून देण्यात आलेला आहे. नांदेड येथील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी पोटनिवडणुकीचं तिकीट न दिल्यास भाजपचा झेंडा हाती धरण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

पंढरपूर येथील पोट निडणुकीप्रमाणेच नांदेड येथील देगलूर मतदार संघात पोट निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. नांदेडमधील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत अंतापूरकर यांच्या मुलाला पोटनिवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे याच मतदार संघातील असलेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनीही पोट निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत प्रसंगी उमेदवारीसाठी भाजपात जायची तयारी ठेवली आहे.

देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी साबणे यांनी केली आहे. अगोदरच पंढरपूर येथील पोट निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला पराभवास सामोरे जावे लागले आहे. आता शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी उमेदवारीसाठी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला सोडण्याचा इशारा दिल्याने नांदेडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

You might also like