मुंबई । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यावरून चर्चांना ऊत येतो. असाच काहीसा भाजपमधील विसंवादाचे दर्शन घडवणारा प्रकार आज घडला.
‘राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत’, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी या विधानातील हवाच काढली.
‘असा कोणताही प्रस्ताव शिवसेनेला आम्ही दिलेला नाही वा शिवसेनेकडून असा काही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील सत्तेबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा पक्षपातळीवर नाही. येत्या काळात स्वबळावर लढायचं, असा निर्णय पक्षाने घेतलेला आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. फडणवीस यांच्या या स्पष्टीकरणामुळे चंद्रकांत पाटील यांनी नेमकं कोणत्या आधारावर शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत विधान केलं होतं, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”