मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला हरामखोर म्हटलं. त्यामुळे राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, मला कंगनाला हरामखोर म्हणायचं नव्हतं. तिला नॉटी गर्ल म्हणायचं होतं. पण माझ्या म्हणण्याचा भलताच अर्थ लावला गेला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सारवासारव केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणात शाहरुख खानचा ही विषय निघाला होता. आमिर खानच्या पत्नीचाही विषय निघाला होता. माझा पक्ष शिवसेना आणि मी भूमिका घेतली. हरामखोर म्हणण्यामागचा माझा तो हेतू नव्हता. तुम्हाला या शब्दाचा तुमच्या भाषेत अर्थ लावून जे वातावरण निर्माण करायचं ते जरूर करा. पण मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो. महाराष्ट्रात हरामखोरचा अर्थ नॉटी असा होतो. बेईमान असा होतो. आमच्या मते कंगना दोन्ही आहे. माझ्या मते ती नॉटी गर्ल आहे. ती नेहमीच मजाक मस्करी करत असते हे मी पाहिले आहे. मुंबईत राहणारी कोणतीही मुलगी देश, महाराष्ट्र आणि मुंबईबाबत काहीही बरळत असेल तर माझ्या मते ती बेईमानच आहे.
माझी कंगनाशी वैयक्तिक दुश्मनी नाही
कंगना कोणत्याही शहरात राहत असती आणि तिने असं वक्तव्य केलं असतं तरी ते चुकीचं होतं. तिने आम्हाला आव्हान दिलंय. आव्हान देण्याचा अर्थ तुम्हाला कळतो का? आमचं म्हणणं एवढंच आहे की, तुमचा मुंबईवर विश्वास नसेल तर नका येऊ मुंबईत, असं राऊत म्हणाले. ड्रग्स प्रकरणात तिला काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर तिने मुंबई पोलिसांकडे जावं. गृहमंत्र्यांना विचारावं, नार्कोटिक्स सेलशी बोलावं. माझी कंगनाशी वैयक्तिक दुश्मनी नाहीये. कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत आल्यावर काय होईल हे माझा पक्ष ठरवेल. सरकार ठरवेल. कोणी कुठेही जाऊ शकतो. पण त्या शहराचा अपमान करू शकत नाही, असंही ते म्हणाले.
गेल्या १०० वर्षात कुणीच असं बोललं नाही
कंगनाला केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या सुरक्षेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने सुरक्षा दिल्याशिवाय का कलाकार सुरक्षित आहेत. मुंबई पोलिसांमुळे सर्वजण सुरक्षित आहेत. एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा धोका होता. अंडरवर्ल्डकडून धमक्या दिल्या जात होत्या. मुंबई पोलिसांनी सर्वांची पाळेमुळं खणून काढली. केवळ एखादी पुरुष किंवा स्त्री म्हणजे संपूर्ण इंडस्ट्री नाही. गेल्या शंभर वर्षात कुणीच असं बोललं नाही. जर तुमच्याकडे ड्रग्सबाबत काही माहिती असेल तर पोलिसांकडे जा. त्यांना माहिती द्या. भाजपशी तुमचे एवढे चांगले संबंध असतील तर दिल्लीत जाऊन तक्रार करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.
shivsena-leader-and-mp-sanjay-raut-apologises-to-kangana-ranaut-calls-her-naughty-girl