मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राऊत आणि राज्यपाल यांच्यात तब्बल १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत बॅकफूटवर गेलेले दिसले. राज्यपाल आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली, असं राऊत म्हणाले.
राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचेही मधूर संबंध आहेत. दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही. आमच्यात दऱ्यावगैरे वाढत नाही, असं सांगतानाच राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. ते पालक असून घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे सर्वांना प्रियच असतात. पण विरोधक जेव्हा राजकारण करतात तेव्हा आम्ही भाष्य करत असतो, असा चिमटाही राऊत यांनी यावेळी काढला. मधल्या काळात मी देसभरातील घटनांविषयी मत व्यक्त केलं होतं. त्याचा मुंबईच्या राजभवनाशी संबंध जोडू नका, असंही ते म्हणाले.
संकटाच्या काळात राजकीय आंदोलनं करणं गैरचं
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्यपालांना सर्व माहिती देण्यात येते. राज्यपाल घटनात्मक प्रमुख असल्याने सरकार त्यांना वेळोवेळी सर्व माहिती देत असते. कोरोना रोखण्यासाठी सरकार काय करत आहे, हे सुद्धा राज्यपालांना माहीत असतं. विरोधक दुसऱ्या बेटावर आहेत. त्यांना काहीच दिसत नाही. त्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही, असा टोला लगावतानाच संकटाच्या काळात राजकीय आंदोलनं करणं गैर आहे. अशावेळी सरकारच्या पाठिशी उभं राहीलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
Member of Parliament (Rajya Sabha) Sanjay Raut today met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call. pic.twitter.com/SFjLZB141i
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 23, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”