हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे. भाजपची गद्दारी हे माझ्या पराभवाचे प्रमुख कारण आहे, अशी टीका क्षीरसागर यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर केली.
शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमदार चंद्रकांत जाधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील होते. ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी भाजपला जागा मिळाली नाही म्हणून ते काँग्रेस पक्षात गेले. तशी कबुलीही काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात दिली आहे.
मागच्यावेळी मी निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपने माझ्याशी गद्दारी केली. माझ्या पराभवाचे मुख्य कारण कोणते असेल तर ते भाजपची गद्दारी हे आहे. निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांनीही माझ्या बद्दल गैरसमज पसरवले होते. मी निवडून आलो असतो तर मंत्रिमंडळात गेलो असतो. मात्र, भाजपकडून शत प्रतिशत सुरू झाल्या पासून ते मित्रांना विसरले. दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकला नाही, असं म्हटलंय. मग, जिल्हा बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजपला सोबत घ्यावस का वाटलं? शिवसेनेवर अन्याय होतोय ही भावना शिवसैनिकांमध्ये आहे, असेही क्षीरसागर यांनी यावेळी म्हंटले.