हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक वाहून गेले आहे. शेतकरी कोलमडला असून त्यांना धीर देण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या राज्यातील ग्रामीण भागांची पाहणी केली जात आहे. प्रमुख नेत्यांपाठोपाठ आता स्थानिक नेत्यांनीही शेतकऱ्यांना भेटून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क मोटार सायकलवरून फिरत अतिवृष्टीची पाहणी करायला सुरुवात केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिथे मोठ्या गाड्यांचा ताफा जाऊ शकत नाही अशा भागात अब्दुल सत्तार मोटार सायकल घेऊन प्रवास करत आहेत. यावेळी स्थानिक आमदार कैलास पाटील यांनी मोटारसायकल चालवली आणि अब्दुल सत्तार हे मोटारसायकलवरून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आणि शेतकऱ्यांना धीर दिला.
परतीचा पाऊस इतका जोरदार होता की शेतात उभी असलेली पिके आणि कापणी करून ठेवलेली पिके दोन्ही पावसाच्या पाण्यात भिजली आहेत. त्यामुळे गुरांना देण्यासाठी वैरणही शिल्लक राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, पंचनाम्यांशिवाय सरसकट मदत जाहीर करता येणार नाही, असे अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाच भरपाई मिळणार, असेही सत्तार यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले.
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या होत्या. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना मदत नक्की देऊ. परंतु, सध्या नेमकी किती मदत द्यायची याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. पंचनामे झाल्यानंतरच प्रत्यक्षात मदत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’