राज्याने केंद्राकडे कर्ज मागितल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

सोलापूर । राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जर केंद्राकडे कर्जाची मागणी केली असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे कर्ज मंजूर करून घेतले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच जाताना गावात जाऊनही घरांची पाहणी केली. तसेच शासनाकडून आलेल्या मदतीचीही विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडूनच कर्ज काढू शकते. इतर कुणाकडून कर्ज घेऊ शकत नाही. त्यामुळे राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केलीय का? याचा आधी खुलासा केला पाहिजे. जर कर्जाची मागणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जोर लावून हे कर्ज मंजूर करून घेतलं पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले. अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपने राजकारण थांबवावं. टोलवाटोलवी बंद करावी. आधीच लोक कोरोनाने त्रासलेले आहेत. उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्या. मदत द्या. शेतकऱ्यांच्या असाहयतेवर राजकारण करू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकार आणि भाजपला दिला.

नुकसान देण्याची पद्धत ठरलेली आहे. त्याचे निकषही आहेत. राज्य सरकारला आता केवळ मदत जाहीर करायची आहे. शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यांचं संसारोपयोगी साहित्यही वाहून गेलं आहे. त्यांना आधी मदत करा. महिनाभर खावटी द्या, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गावात पाहणीसाठी आलेच नसल्याच्या तक्रारीही गावकऱ्यांनी केल्या असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य सरकारसोबत चर्चा करू. त्यानंतर काय करायचं त्याची पुढची दिशा ठरवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (prakash ambedkar visit flood affected area in solapur)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”