Wednesday, October 5, 2022

Buy now

‘तू गद्दार आहेस’, शिवसैनिकाने थेट बंडखोर आमदाराच्या फेसबुक पेजवरुनच टाकली पोस्ट

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात सध्या सत्ताकारणाचा हायवोल्टेज ड्रामा सुरु आहे. शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार बंड करुन गुवाहाटीला निघून गेले आहेत. राज्यातील मविआ सरकारला सत्ता सोडावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच विरोधात एवढे मोठे बंड केल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यासर्व प्रकारामुळे राज्यातील शिवसैनिक मात्र चांगलेच संतापले आहेत.

अशाच एका संतापलेल्या शिवसैनिकाने थेट एका आमदाराच्या ब्लू टीक असणार्‍या फेसबुक पेजवरुन ‘तू गद्दार आहेस गद्दार’ अशा आशयाची पोस्ट केली आहे. शिवसैनिकाच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे या आमदाराची भलती नाचक्की झाली आहे. सध्या श्रीनिवास चिंतामन वंगा या शिवसेनेच्या पालघर मधील आमदाराच्या फेसबुक पेजवरील पोस्ट चांगलीच व्हायरल झालीय.

शिवसेना आणि कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर निवडुन येऊन सुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी करणारा, सामान्य जनतेसोबत लबाडी करणारा स्वार्थी श्रीनिवास तु गद्दार आहेस गद्दार असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. शेवटी Posted By #RealShivSainik असं लिहिलं गेलं आहे.

https://www.facebook.com/100048743932320/posts/pfbid02F2NEkekC6kBmeMfwufFBkM8WDrLdt3kQ2XyETxv6qhow1x2db1e1ucGatxzrjZ3ul/?d=n

दरम्यान, ही फेसबुक पोस्ट नक्की कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. नेटकरी मात्र या व्हायरल पोस्टची मजा घेत आहेत. अनेकांनी या आमदाराने सदाभाऊंप्रमाणे सोशल मिडिया चालवणार्‍याचे पेअमंट केलेलं नाहीये की काय अशी मिश्किल टीपण्णी केलीय.