गोपीचंद पडळकर म्हणजे बांडगुळ ; शिवसेनेचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर तोंडसुख घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून आता शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी पडळकरांवर हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर हे बांडगूळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत अशी जहरी टीका त्यांनी केली.

मनीषा कायंदे म्हणाल्या, गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत. मोठ्या माणसांची नावं घेतली की आपलं नाव मोठं होतं असं पडळकरांना वाटतं. पण खरं तर शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी घणाघाती टीका मनिषा कायंदे यांनी केली.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले –

संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा असून खातो सेनेचे आणि जागतो पवारांना अशी टीका पडळकररांनी केली होती. संजय राऊत सारख्या भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही काकांच्या सांगण्यावरून सामना अग्रलेखात अविनाश भोसले हे किती अजित पवारांच्या जवळचे आहेत हे सांगतोय आणि पुतण्याच्या मागे फटाके लावायचे काम करतोय. हा असा हुजऱ्या ना जन्माला येईल ना येणार अशी जळजळीत टीका पडळकरांनी केली होती.