हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मोठे मंत्री आता दादरा नगर हवेलीत दाखल झाले आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या हजेरीवरूनही संजय राऊतांनी फिरकी घेतली. जो बायडन जरी आणले, तरी आम्ही घाबरत नाही, असे संजय राऊतांनी म्हंटल.
दादरा नगर हवेलीतील प्रशासनाची दहशत मोडून काढण्यासाठी शिवसेना साथ देईल. इथल्या जनतेच्या विकासासाठी शिवसेना त्यांच्या पाठिशी उभे राहिलं, असं संजय राऊत म्हणाले. देशात सध्या केंद्रातील मंत्र्यांना कोणतंही काम राहिलेलं नाही. त्यामुळं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत रेल्वे मंत्री तळ ठोकून बसले आहेत. रेल्वे विकून टाकली त्यामुळं रेल्वेमंत्री दादरा नगर हवेलीत आले आहेत. इथं इतरही मंत्री येतील. बंगालमध्येही गेले होते. तिथं त्यांचं काय झालं. भाजपनं दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जो बायडन यांना आणावं असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
पश्चिम बंगालमध्ये केंद्रातले संपुर्ण मंत्रीमंडळ विधानसभा निवडणूकीसाठी उतरले होते. पण ममता बॅनर्जींसमोर भाजपचे काहीच चालले नाही. त्याच पद्धतीने सिल्वासामध्ये भाजपचे काहीही चालणार नाही. सातवेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला सहानभूतीची गरज नाही, असेही ते म्हणाले. मोहन डेलकर यांनी कायम संघर्ष केला. शिवसेनेने डेलकर कुटुंबीयांचा न्याय मिळवून देण्यासाठी हात पकडला आहे, शिवसेना शेवटच्या श्वासापर्यंत सोबत लढणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.