हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सची छापेमारी अजूनही सुरुच असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला आहे. इनकम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच आहे का असा सवाल त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की, मला वाटतं केवळ महाराष्ट्रातच इन्कम आहे आणि टॅक्स आहे. मुंबई सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते. जिथे जिथे भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात इन्कमही नाही आणि टॅक्सही नाहीये. या राज्यांमध्ये सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्रास देण्याचं काम सुरू आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणेला फक्त महाराष्ट्रतच काम आहे असा टोला लगावत महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहे असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.