हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या पूरस्थितीवरुन विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करत असतानाच आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आमचीही अपेक्षा आहे की, पंतप्रधान मोदींनी यावे हेलिकॉप्टरनं गिरकी मारावी आणि पूरग्रस्तांना १००० कोटी रुपयांची मदत करावी असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लान्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर देखील निशाणा साधला. राज्यातील विरोधी पक्ष मोकळा आहे. मोकळा माणूस असतो तेव्हा डोक रिकामं असते त्यामुळे ते असे आरोप करत असतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार अंतरवादामुळे पडणार असल्याचे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मात्र हे सरकार उरलेला तीन वर्षाचा काळ अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे. यामुळे उरलेल्या या तीन वर्षांच्या काळामध्ये कोणी पुन्हा येण्याची शक्यता नाही अस म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला.